सीसीटीव्ही कॅमेरे झाकून अडीच कोटींचा दरोडा ; मुलाच्या साखरपुड्यासाठी कुटुंब गेले होते बाहेर
नागपूर : शिर्के लेआऊट परिसरात अज्ञात चोरट्याने सुनियोजित पद्धतीने तब्बल अडीच कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कुटुंब साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असतानाच चोरट्याने घर रिकामे असल्याची खात्री करून मध्यरात्री घरफोडी केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिर्के लेआऊट येथील रहिवासी बलजिंदरसिंग इंद्रजितसिंग नय्यर (५६) हे शहरातील नामांकित पेट्रोल पंप चालक व व्यावसायिक आहेत. सोमवारी त्यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा असल्याने संपूर्ण कुटुंब कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध रीतीने चोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. चोरट्याने घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर थेट बेडरूममधील कपाट लक्ष्य करत कुलूप तोडले. कपाटातून २४७ तोळे सोन्याचे दागिने, सुमारे एक कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आणि ६५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेण्यात आली. एकूण चोरीचा ऐवज अंदाजे अडीच कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्याने घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे कापडाने झाकले होते. त्यामुळे चोरटा पूर्ण तयारीने आल्याचे स्पष्ट होते. मात्र, सर्व कॅमेरे झाकण्यात तो यशस्वी ठरला नाही. एका कॅमेऱ्यात चोरटा चोरी करताना कैद झाला असून हे फुटेज पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरत आहे. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपास सुरू असून स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.







