पॉक्सोच्या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या ; जरिपटका पोलीस ठाण्यात खळबळ
नागपूर : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत असताना गळफास लावत आत्महत्या केली. जरिपटका पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मनोजकुमार रामजी भाटिया (१९) असे पॉक्सो प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर कोठडीत आत्महत्या केलेल्या आरोपीची नाव आहे. मनोजकुमार हा मुळचा उत्तरप्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातल्या हंडीया गावातील रहिवासी होता.
जरिपटका भागातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणात जरिपटका पोलिसांनी त्याला प्रयागराज पोलिसांच्या मदतीने उत्तरप्रदेशातून अटक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे कालच त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर जरिपटका पोलीस या घटनेच्या तपासात आरोपीची चौकशी करत होते. बुधवारी रात्री त्याने कोटडीतच गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ठाण्यातील कर्मचारी कोठडीकडे गेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

जरिपटका ठाण्यातील पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण घेण्यासाठी उत्तरप्रदेशातून नागपुरात आलेल्या मनोजकुमार याने जरिपटका भागात राहत असताना एका अल्पवयीन मुलीला गावाकडे पळवून नेले होते. याच प्रकरणात मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला उत्तरप्रदेशातील प्रयागराज पोलिसंच्या मदतीने मुलीसह नागपुरात आणले होते.







