मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्येचा देखावा ; 23 वर्षीय प्राचीला राहत्या घरात संपवलं
नागपूर : शहरातील मानकापूर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत गोधनी येथील कलेक्टर कॉलनीतील राजलक्ष्मी सोसायटीमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय प्राची खापेकर हिची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोस्टमार्टम अहवालाने हा प्रकार थंड डोक्याने आखलेली हत्या असल्याचे उघड केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राचीचे वडील हेमराज खापेकर आणि आई रुख्मिणी यांच्यासह बँकेत गेले होते. घरातील इतर सदस्य आपापल्या कामावर गेले होते. त्यामुळे त्यावेळी घरात प्राची एकटीच होती. दुपारी सुमारे १२ वाजता आई आणि वडील घरी परतले असता मुख्य दरवाजा आतून बंद आणि खालच्या मजल्याचा दरवाजा उघडा आढळला. अनेकदा हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला. घरात पाहणी केली असता, प्राची दिसत नव्हती. वरच्या मजल्याचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने छताच्या मार्गाने पहिल्या मजल्यावर प्रवेश करण्यात आला. दरवाजा तोडल्यानंतर खोलीत प्राची पंख्याला लटकलेली दिसून आली. त्यानंतर तातडीने मानकापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. मानकापूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अहवालात प्राचीच्या डोक्यावर आणि शरीरावर जखम आणि गळ्यावर खुणा आढळल्याने आत्महत्येचा बनाव असल्याचे स्पष्ट झाले.

तपासात अज्ञात आरोपीने धारदार किंवा जड वस्तूने प्राचीच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली आणि नंतर दुपट्ट्याच्या सहाय्याने मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्येचा पंख्याला लटकवून आत्महत्येचा देखावा निर्माण केल्याचे समोर आले आहे. मृतक प्राचीच्या आईच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून विशेष तपास पथक स्थापन केले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि प्राचीच्या सोशल मीडियाचा तपास सुरू केला आहे.







