मांढळच्या शिव मंदिर देवस्थानचा आध्यात्मिक सोहळा संपन्न ; विठ्ठल नामाच्या जयघोषाने नगरी दुमदुमली
कुही : मांढळ येथील शिव मंदिर देवस्थान पंचकमेटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमद भागवत कथा व नामसंकीर्तन सप्ताहाची सांगता रविवारी अत्यंत उत्साहात झाली. ह.भ.प. ओमदेव चौधरी महाराज यांच्या सुश्राव्य प्रवचनाने आणि गोपालकाल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याला विशेष उंची प्राप्त करून दिली. भव्य रामधून आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण मांढळ नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली होती. महाराजांच्या वाणीतून भागवत कथेचे रसपान सप्ताहाच्या काळात ह.भ.प.ओमदेव चौधरी महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथेचे निरूपण केले. महाराजांच्या ओघवत्या शैलीतील प्रवचनामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
”नामसंकीर्तनातूनच मानवी जीवनाचे सार्थक होते.”असा संदेश महाराजांनी आपल्या प्रवचनातून दिला. शेवटच्या दिवशी हभप.ओमदेव महाराज चौधरी यांनी सादर केलेल्या गोपालकाल्याच्या कीर्तनाने या ज्ञानयज्ञाची सांगता झाली. यावेळी नागरिकांची विशेषतः महिलांची हजरोच्या संख्येने उपस्थित राहून गोपाळकाला संपन्न केला. सांगता दिनानिमित्त गावातील प्रत्येक मार्गाने भव्य रामधून काढण्यात आली. यामध्ये आबालवृद्धासह हजारो नागरिक सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल-विठ्ठल,विठ्ठला हरी ओम विठ्ठला,ज्ञानोबा – ज्ञानोबा माऊली तुकाराम व रामकृष्ण हरी’ च्या जयघोषाने अवघी नगरी दुमदुमली होती. डीजे च्या आवाजात तरुण – तरुणी थिरकत होत्या तर महिला व शालेय विद्यार्थिनींचे लेझीम पथक रॅलीचे आकर्षण ठरले. महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या रामधूनला शोभा आली. सप्ताहानिमित्त दररोज रात्रीला शिवचरित्रकार हभप. किशोर महाराज ठाकरे खानापूर, हभप. शिवाजी महाराज झांबरे बुलढाणा, हभप. पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप. पंढरीनाथ महाराज दिनोडे, जळवा पळसखेड, हभप. गणेश महाराज पाटील, हभप. संतोष महाराज जाधव यांनी आपले भक्तिमय कीर्तन सादर केले तर हभप. संतोष महाराज भालेराव यांनी भारुड कीर्तन सादर करून भाविकांमध्ये भक्ती जागृत केली.

या आध्यात्मिक सोहळ्याला रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी आमदार राजू पारवे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी शिव मंदिर देवस्थान पंचकमेटीच्या वतीने दोन्ही मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते, अशा भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या. हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद कार्यक्रमाच्या शेवटी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मांढळ व परिसरातील सुमारे १२-१४ हजाराच्या वर नागरिकांनी महाप्रसादाचा सहसंस्काराने लाभ घेतला. शिव मंदिर देवस्थान पंचकमेटी व समस्त ग्रामस्थांनी या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीमय वातावरणामुळे हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.







