डोंगरगाव – खेतापूर रस्त्याची दुरावस्था : चिमुकल्यांचा शालेय प्रवास बनला ‘अडथळ्यांची शर्यत’ ; रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
कुही : डोंगरगाव ते खेतापूर – नवरगाव या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि पावसाळ्यामुळे साचलेला चिखल यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून, चिखलातून वाट काढत शाळेत जाताना चिमुकल्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खेतापूर – नवरगाव येथील अनेक विद्यार्थी माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी डोंगरगाव, कुही व नागपूर येथील शाळांमध्ये जातात. मात्र, रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की, सायकल चालवणे तर दूरच, साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. अनेकदा चिखलात पाय घसरून विद्यार्थी पडतात, त्यांचे कपडे आणि पुस्तके खराब होतात, ज्यामुळे त्यांना अर्ध्यातूनच घरी परतावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुचाकीस्वारांचे तर कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळणेही या दुरवस्थेमुळे कठीण झाले आहे.

रस्त्याच्या कामाबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी, आमदार आणि संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.’आमच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे की चिखलाशी वा खड्ड्याशी झुंज द्यायची?’ असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन रस्ता दुरुस्त न केल्यास, डोंगरगाव आणि खेतापूरचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिक्रिया : “रस्त्यावर पायी चालतानाही भीती वाटते. खड्ड्यांमुळे सायकल चालवता येत नाही. प्रशासनाने रस्ता लवकर दुरुस्त करावा जेणेकरून आम्हाला वेळेवर शाळेत पोहोचता येईल.” — कु.मनस्वी गमे व अंशुल घोडमारे – शालेय विद्यार्थी







