चाडा–तारणा रस्ता मृत्यूचा सापळा
प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल
कुही :- चाडा ते तारणा हा तालुक्याच्या मुख्यालयाकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा व एकमेव रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून अक्षरशः दयनीय अवस्थेत आहे. रस्त्याला रस्ता म्हणावे की खड्ड्यांची मालिका, असा प्रश्न निर्माण झाला असून वाहनधारक व नागरिक रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांकडे निवेदने दिली, आंदोलनांचा इशाराही दिला. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे व प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
हा रस्ता तालुक्याच्या मुख्यालयाशी जोडणारा एकमेव मार्ग असल्याने शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल, उखडलेली डांबरीकरण यामुळे अनेक अपघात घडले असून तरीही संबंधित यंत्रणा अजूनही गाढ झोपेतच आहे.
अपघातात जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का ?
हा प्रश्न आज संतप्त नागरिक विचारत आहेत. वेळेत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तरी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा जनतेचा संयम संपण्याची वेळ दूर नाही.







