सातनवरी येथे पंचमुखी हनुमान देवस्थानात भव्य महाप्रसाद सोहळा
कुही : श्री क्षेत्र पंचमुखी हनुमान देवस्थान, सातनवरी येथे दिनांक २ फेब्रुवारी (सोमवार) रोजी भक्तिभावाने आणि उत्साहात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने देवस्थान परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमानिमित्त सकाळपासून श्री हनुमानाची विधिवत पूजा, अभिषेक, आरती व अन्य धार्मिक विधी पार पडणार आहेत. त्यानंतर दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतील, असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे. श्री क्षेत्र पंचमुखी हनुमान देवस्थान हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. येथे नियमितपणे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात.

महाप्रसादाच्या आयोजनातून समाजात एकोप्याची भावना निर्माण व्हावी तसेच भाविकांना अध्यात्मिक समाधान मिळावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले. या महाप्रसाद सोहळ्यासाठी सातनवरी तसेच परिसरातील सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.







