मेडिकलच्या निवासी डॉक्टरची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
नागपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) नेत्ररोग विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमात अवघ्या सहा दिवसांपूर्वी प्रवेश घेतलेल्या एका निवासी डॉक्टरने गणेशपेठ येथील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. ही माहिती कळताच वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. रित्विक सागर ठाकूर (२६) रा. चिखली असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्याचे वडील डॉ. ठाकूर आणि आई दोघेही चिखली येथे खासगी वैद्यकीय व्यवसाय करतात. त्याची बहीण मेडिकलमध्येच एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत आहे.
रित्विकचा २७ जानेवारीपासून मेडिकलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने २६ जानेवारीला त्याने नागपूर गाठले होते. मेडिकलमध्ये वसतिगृह उपलब्ध होण्यास विलंब असल्याने त्याने गणेशपेठ येथील ‘हॉटेल अर्जुन’मध्ये खोली घेतली होती. नियमानुसार त्याने नेत्ररोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात सेवा देण्यासही सुरुवात केली होती. सोमवारी (२ फेब्रुवारी) तो बाह्यरुग्ण विभागात अनुपस्थित राहिला. त्यामुळे विभागप्रमुख डॉ. दिलीप कुमरे यांनी रित्विकचा वडिलांशी संपर्क साधला. तो गणेशपेठ येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका विद्यार्थ्याला तेथे पाठवण्यात आले. मात्र, खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना पाचारण करून खोलीचे दार तोडले. आत रित्विक पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तातडीने मेडिकलमधील वरिष्ठ अधिकारी तसेच त्याच्या आई-वडिलांना याची माहिती देण्यात आली.

रित्वीकचा मृतदेह पाहताच आई-वडील व बहिणीचा अश्रूंचा बांध फुटला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठवण्यात आला. रित्वीकला एमडी मेडिसिनमध्ये प्रवेश घ्यायचा होता. मात्र त्या विषयात जागा उपलब्ध न झाल्याने त्याला नेत्ररोग विषयात प्रवेश घ्यावा लागल्याची चर्चा होती. या अथवा इतर कोणत्या कारणाने त्याने आत्महत्या केली. हे पोलीस तपासातच स्पष्ट होणार आहे.







