Home कुही मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीवर कुही पोलिसांची कारवाई : ३ आरोपी अटकेत...

मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीवर कुही पोलिसांची कारवाई : ३ आरोपी अटकेत ; ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीवर कुही पोलिसांची कारवाई : ३ आरोपी अटकेत ; ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

कुही : कुही पोलीस स्टेशन हद्दीत मागील एक महिन्यापासून वाढलेल्या मोटार सायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कुही पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून चोरीच्या आठ मोटार सायकलींसह एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले व पोलीस हवालदार सुधीर ज्ञानबोनवार हे मांढळ परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, भोला हुडकी, मांढळ येथील राकेश विठोबा पिदुरकर (वय ३० वर्ष) याने आपल्या घरी चोरीच्या मोटार सायकली ठेवल्या असून त्या विकण्याच्या तयारीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ त्याच्या घरी छापा टाकला असता एक विनानंबरची हिरो स्प्लेंडर मोटार सायकल आढळून आली. सदर मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता ती चांपा येथील बाजारातून चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली. पुढील सखोल चौकशीत आरोपी राकेश पिदुरकर याने आकाश शामराव वाकडे व संदेश नामदेव आंबेकर (दोघेही रा. भोला हुडकी, मांढळ) यांच्या साथीने कुही, मांढळ (वडेगाव), चांपा, वेलतूर, मौदा हद्दीतील गुमथळा व वडोदा परिसरातून MH-40 CJ-8659, MH-40 CW-3444, MH-40 BQ-5608, MH-40 VJ-5379, MH-40 AE-4003, MH-40 CP-2333, MH-40 CP-4656 व MH-40 CK-3445 अशा एकूण आठ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटार सायकली फायनान्सवरील असल्याचे भासवून आरोपींनी त्या राजोला, मांढळ परिसरात विक्री केल्याचेही तपासात उघड झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चोरीच्या आठ मोटार सायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ३ लाख २० हजार रुपये आहे.

या प्रकरणी आरोपी राकेश विठोबा पिदुरकर, आकाश शामराव वाकडे आणि संदेश नामदेव आंबेकर यांना कुही पोलीस स्टेशन येथे अप.क्र. ०४/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.स. अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन (उमरेड विभाग) व पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले, पोलीस हवालदार सुधीर ज्ञानबोनवार, नापोशी रोशन नारनवरे, पोलीस अंमलदार रंजीत मेश्राम, रविंद्र मारबदे, विपुल चरडे व दुर्योधन मस्के यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Don`t copy text!