ब्राम्हणीच्या हनुमान मंदिरात दोन अजगरांचे दर्शन : सर्पमित्रांच्या सतर्कतेने टळला थरार
कुही : भक्ती आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या हनुमान मंदिरात अचानक दोन महाकाय अजगराची एन्ट्री झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मांढळ जवळील ब्राम्हणी (मोडकी) येथील हनुमान मंदिरात दोन विशालकाय अजगर आढळून आल्याने भाविकांची आणि ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, सर्पमित्रांच्या समयसूचकतेमुळे या अजगरांना जीवदान मिळाले असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
नेहमीप्रमाणे ब्राम्हणी येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी हालचाली सुरू असताना, रामकृष्णा ठवकर यांना मंदिराच्या परिसरात दोन मोठे अजगर एकाच ठिकाणी दिसून आले. एकाच वेळी दोन अजगर पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून आकाश लोंदासे यांनी तात्काळ मांढळ येथील सर्पमित्रांशी संपर्क साधला आणि माहिती दिली. माहिती मिळताच मांढळ येथील सर्पमित्र विकास दिघोरे, आकाश पोहणकर, आकाश वडतकर, वैभव पोहणकर आणि कुणाल पाटील यांनी कोणताही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. मंदिरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी अजगरांना पकडणे आव्हानात्मक होते, परंतु या चमूने अत्यंत दक्षता आणि कौशल्याने दोन्ही अजगरांना सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले.

अजगरांना पकडल्यानंतर सर्पमित्रांनी केवळ त्यांचे प्राणच वाचवले नाहीत, तर उपस्थित नागरिकांना अजगरांच्या प्रजातीबद्दल माहिती देऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली. ‘अजगर हा बिनविषारी साप असून तो पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कसा महत्त्वाचा आहे,’ असे सांगत त्यांनी जनजागृती केली. दोन्ही अजगरांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. सर्पमित्रांच्या या धाडसी आणि समाजोपयोगी कार्याबद्दल ब्राम्हणी आणि मांढळ परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
प्रतिक्रिया : “मंदिरात अजगर दिसल्याने भीती होती, पण सर्पमित्रांनी ज्या पद्धतीने काम केले ते वाखाणण्याजोगे आहे. प्राण्यांचे प्राणही वाचले आणि आमची भीतीही गेली.”– आकाश लोंदासे व रामकृष्णा ठवकर व ग्रामस्थ







