महाशिवरात्री उत्सव : नागपूर – कुही मार्गावरील जड वाहतूक वळवली ; आंभोरा येथील गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा निर्णय
कुही : आंभोरा येथील प्रसिद्ध स्वयंभू श्री चैतन्येश्वर महाराज देवस्थान येथे साजरा होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, नागपूर ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेता, नागपूर ते कुही मार्गे भंडारा जाणारी जड वाहतूक इतर मार्गाने वळवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी दिले आहेत.
आंभोरा येथील नवीन केबल पुलामुळे यावर्षी पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. कालावधी : १४ फेब्रुवारी २०२६ (रात्री ११:०० वाजल्यापासून) ते १७ फेब्रुवारी २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत). नागपूर ते कुही मार्गे भंडारा जाणारी सर्व जड वाहतूक आता कुही – वडोदा- मौदा- भंडारा या मार्गाने धावेल. पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, दरवर्षी महाशिवरात्रीला महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

यावर्षी आंभोरा येथील केबल पूल सुरू झाल्याने अंदाजे ८० ते ९० हजार भाविक येण्याचा अंदाज आहे. विशेषतः पुलावर सेल्फी आणि फोटोग्राफीसाठी होणारी गर्दी विचारात घेता, सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ”नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि प्रवासात अडथळा येऊ नये यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. वाहनधारकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.







