महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी करीत 50 हजाराची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपूर : शहरातील शांतिनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. एका महिलेला जबरदस्तीने शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत, नकार दिल्यानंतर चाकूच्या धाकावर ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शांतिनगर पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र उर्फ मोनू मनोज समुद्रे (वय २७), रा. ठक्कर ग्राम, हा २० फेब्रुवारी रोजी संबंधित महिलेच्या घरी गेला. त्याने महिलेकडे अश्लील मागणी करत जबरदस्तीने शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र महिलेने ठाम भूमिका घेत त्यास घराबाहेर जाण्यास सांगितले. महिलेकडून विरोध झाल्याने आरोपी संतापला. यानंतर आरोपीने आपला सूर बदलत थेट ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. महिलेच्या आरडाओरडीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ शांतिनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच आरोपीला अटक केली.

विशेष म्हणजे, आरोपी दोन महिन्यांपूर्वीच आठ वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवसाढवळ्या घरात घुसून अशा प्रकारे धमकावण्याचे धाडस होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मात्र नागरिकांना घाबरून न जाता तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.







