१२.६८ किलो गांजा सह ४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त : नागपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई ; एक आरोपी अटकेत
कुही : अंमली पदार्थविरोधी कारवाईत नागपूर ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले असून १२.६८ किलो गांजा व ४ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन कुही हद्दीत २४/०२/२०२६ रोजी अंमली पदार्थविरोधी पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. उमरेड – नागपूर रोडवर संशयित हालचाल दिसून आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. आरोपी आकाश युवराज पंचभाई, वय ३० वर्षे, रा. पिंपळगाव निपाणी, ता. पवनी, जि. भंडारा हा विनाक्रमांक बुलेट मोटरसायकलवर दोन काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन जाताना आढळून आला.

पोलिसांनी पाठलाग करून त्याला कुही फाटा येथे ताब्यात घेतले. पंचासमक्ष झडती घेतली असता बॅगांमध्ये १२.६८ किलो गांजा आढळून आला. आरोपीकडून २,५३,६०० रुपये किंमतीचा गांजा, विनाक्रमांक बुलेट मोटरसायकल व मोबाईल असा एकूण ४,१४,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात गांजा पुरवठा करणाऱ्या इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी पोलीस स्टेशन कुही येथे कलम ८(क), २०(ब)(ii)(ब), २२, २९ एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.







