कुही तालुक्यात कमी उंचीच्या पुलांमुळे गावखेड्यात उद्भवते आपत्कालीन स्थिती
कुही :- तालुक्यातील बहुतांशी रस्त्यांवरील नाला/पाट यावर अजूनही जुनेच पूल आहेत. आजघडीला रस्त्यांची उंची जास्त व पुलांची उंची कमी अशी परिस्थिती असल्याने थोड्याशाही पावसाने या नाल्यांना पाणी आले कि पुलावरून पाणी वाहते व परिणामी वाहतूक ठप्प होते.यावर स्थानिक नागरिकांनी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधी यांना परिस्थितीची जाणीव करून देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
मागील आठवड्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे अनेक कमी उंचीचे पूल पाण्याखाली येऊन त्यावरील वाहतूक बंद पडल्याने गावांचा संपर्क तुटून गावातून बाहेरच पडता येत नसल्याने आणीबाणीच्या वा आरोग्याच्या कामासाठी बाहेर पडता येत नाही. हि परिस्थिती तालुक्यातील मोहाडी,भोवरदेव सह अनेक गावांत असून अनेकदा मागणी करूनही पुलांचे काम होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.