पीक कर्जाची प्रकरणे तात्काळ मार्गी लावा अन्यथा आंदोलन
भाजपचे निवेदन
कुही : शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहेत.तालुक्यातील बँक व्यवस्थापक जाणूनबुजून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे, असा आरोप भाजपाच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र वेलतूरचे व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना प्रतिमहा १५०० रुपये देण्यात येत आहे. मात्र तालुक्यातील बँकांमध्ये असंख्य महिलांचे आधारकार्ड, मोबाइलक्रमांक, केवायसी न झाल्याने अनेक जणींना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.शासनाचे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे मानधन बँक कर्ज खात्यात जमा करून ज्येष्ठांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे. शासन शेतकऱ्यांना विविध योजनेतून मिळणारे अनुदान कर्ज खात्यात जमा करीत आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे.अनेक शेतकऱ्यांचे पीककर्ज त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यासाठी तालुक्यातील बँक व्यवस्थापकाने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये व येत्या तीन दिवसांत हे सर्व प्रश्न मार्गी लावावे, अन्यथा बँकेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात भाजपचे जिल्हा महामंत्री सुनील जुवार, पंचायत समिती उपसभापती इस्तारी तळेकर,पंचायत समिती सदस्य पंकज मेश्राम, साळवा सरपंच नितेश मेश्राम, माजी सभापती व भाजपा तालुकाध्यक्ष वामन श्रीरामे, माजी सरपंच ग्यानिवंत साखरवाडे, गजानन धांडे, हरदोलीचे सरपंच धनराज पडोळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सौरभ दंडारे, उमेश वाडीभस्मे, खेमराज तितरमारे, दिगंबर घुगूस्कर व भाजप कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थिती होते.