पाण्यात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू ; पंचक्रोशीत शोककळा पसरली
कुही :- तालुक्यातील मौजा -आकोली नजीक असलेल्या रेल्वे पुलानजीक नाल्यात पोहायला गेलेल्या एका 9 वी च्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.या घटनेने पंचक्रोशीत हरहर व्यक्त केली जात आहे.
क्रिश प्रकाश मेश्राम (वय-15) रा. आकोली असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. क्रिश हा रविवारची सुट्टी असल्याने नेहमीप्रमाणे जेवण करून सकाळी दहाच्या सुमारास घराबाहेर पडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक क्रिश हा गावानजीक असलेल्या रेल्वे पूलाजवळच्या नाल्याच्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर काही मित्रांसमवेत गेला होता. तेथे तो पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज नसल्याने तो पाण्यात बुडाला. मित्र बुडताना दिसताना सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरडा करत याची माहिती गावात दिली.घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठे गर्दी केली. लागलीच याची माहिती कुही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने क्रिशच्या दहा फूट खोल पाण्यात असलेला मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून त्याचे शव उत्तरिय तपासनीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मृतक क्रिश हा कुही येथील नूतन विद्यालयाचा नववीचा विद्यार्थी होता. त्याचे आई-वडील मोलमजुरीचे काम करतात. क्रिशच्या मृत्यूने आकोली गावात शोककळा पसरली आहे. कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार भानुदास पीदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. कुलकर्णी करत आहेत.