यंदा श्रावणाची सुरुवात अन् सांगता सोमवारीच ; ७१ वर्षानंतर जुळला योग

यंदा श्रावणाची सुरुवात अन् सांगता सोमवारीच

 

७१ वर्षानंतर जुळला योग

कुही :-  यावर्षीचा भगवान महादेवाच्या उपासनेचा श्रावण मास सोमवार ५ ऑगस्ट रोजी सुरू होत असून, ३ सप्टेंबरला सोमवारीच या महिन्याची समाप्ती होत आहे. यासह यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आहेत.हा दुर्मीळ योग तब्बल ७१ वर्षांनंतर आला असल्याचे जाणकारांचे मत आहे. यावर्षी श्रावण मास सोमवारी सुरू होणार असून, सोमवारीच समाप्ती होत आहे. त्यामुळे यावर्षी महादेवाच्या भक्तांसाठी पाच सोमवारचा अनोखा योग जुळून आला आहे. तब्बल सात दशकानंतर हा योग आल्याचे  सांगितले जाते. यापूर्वी १९५३ मध्ये असा योग आला होता. त्यावर्षी सोमवारी १० ऑगस्ट रोजी श्रावण आरंभ होऊन सोमवारीच ८ सप्टेंबर रोजी श्रावणाची समाप्ती झाली होती. तर २०२३ मध्ये अधिक मासामुळे श्रावण दोन महिने चालला होता. त्यामुळे अनेकांनी त्यावेळी आठ श्रावण सोमवार केले होते. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना या नावाने संबोधित केले जाते.श्रावण महिना हा खुप महत्वाचा महिना मानला जातो.त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे.अनेक भारतीय हिंदू हे हा संपुर्ण महिना उपवास करतात. तसेच बहुतेक हिंदू हे सोमवारी शंकराची तर मंगळवारी देवी पार्वतीची उपासना करतात.या महिन्यातील पाळण्यात येणारा मंगळवारचा उपवास हा ‘मंगळागौरी व्रत’ म्हणुन ओळखतात. तर महिला प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाची पूजा अर्चना करतात. शिवाय प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमुठ महादेवाला अर्पण केली जाते. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारीच होत असून सांगता देखील सोमवारीच होणार असल्याने भाविकांमध्ये यंदाच्या श्रावण महिन्याचे विशेष असे महत्त्व आहे.