नगरपंचायत कुहीची प्लास्टिक जप्तीची कारवाई

नगरपंचायत कुहीची प्लास्टिक जप्तीची कारवाई

कुही : नगरपंचायतच्या वतीने आज शहरातील विविध ठिकाणी प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. प्लास्टिकमुक्त शहर घडविण्याच्या उद्देशाने नगरपंचायत प्रशासनाने ही मोहीम राबवली. नगरपंचायत मुख्याधिकारी श्री. रामेश्वर पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर कार्यवाहीमध्ये नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी राजू आसोले, उमेश चटप , लेखापाल दत्तात्रय साठे, स्थापत्य अभियंता  निहाल मालवीकर, निरीक्षक  विनोद सांडेकर, स्वच्छता निरीक्षक चैतन्य गायकवाड, वैभव साखरकर, प्रियंका येवले, योगेश्वर तलमले, ऋषी तलमले, कवडू जुमळे, संग्राम खतवार, गोपाळ लेंडे इ. अधिकारी व कर्मचारी सदर मोहिमेमध्ये सहभागी होते. कारवाई दरम्यान दुकाने, बाजारपेठा, रस्त्यावरचे विक्रेते इत्यादी ठिकाणी तपासणी करून प्लास्टिकच्या पिशव्या, कप, थर्माकोलचे साहित्य आणि इतर सिंगल-यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण १९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित विक्रेत्यांवर २५००/-रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात आला आहे.

मुख्याधिकारी श्री.रामेश्वर पांडागळे यांनी सांगितले की, पर्यावरण विभागाचे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम – २०१६,  अधिसूचना क्र.G.S.R ५७१(E) दि.१२/०८/२०२१ अन्वये दि.३०/११/२०२२ पासून ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरिबॅगवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन अधिसूचना पर्यावरण विभाग यांचेकडील परिपत्रकान्वये महाराष्ट्र शासनाद्वारे प्लास्टिक व थर्मोकोल इ.पासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक यांचे नियमन करण्याकरिता अधिसूचना दि. २३/०६/२०१८ ला पूर्ण राज्यात लागू करण्यात आलेले आहे. “प्लास्टिकमुक्त कुहीसाठी नगरपंचायत कटिबद्ध असून नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडावेत. “नगरपंचायतने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळून पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे आणि शहर स्वच्छ ठेवण्यात सहकार्य करावे.