नागपुर: प्रॉपर्टी डिलरच्या आत्महत्येप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल; सुसाईड नोटमध्ये अनेकांची नावे
नागपूर : प्रॉपर्टी डिलर आत्महत्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी महिला प्रॉपर्टी डिलर्ससह 16 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. श्रावण नत्थू सातपुते (वय 50, रा. भरतवाडा) असे आत्महत्या करणाऱ्या लॅण्ड डेव्हलपर्सचे नाव आहे. गेल्या 4 महिन्यांपासून श्रावण प्रचंड तणावात होते. श्रावण यांनी भागीदारीत अख्तर बानो, विजेता तिवारी आणि अमन खान यांच्यासोबत मिळून काही भूखंड खरेदी करून लेआऊट टाकले होते.
तिन्ही आरोपींनी त्यांची परवानगी न घेता लेआऊटमधील प्लॉटची विक्री केली. मात्र, पैसे दिले नाही. त्यांना अख्तर बानो हिच्याकडून 1.68 कोटी, विजेताकडून 1.25 कोटी, सादिक व प्रतिककडून 25 लाख आणि राहुलकडून 28.50 लाख घ्यायचे होते. आरोपींकडून पैसे मिळत नसल्याने श्रावण आर्थिक अडचणीचा सामना करत होते. त्यामुळे त्यांनी इतर आरोपींकडून काही रक्कम उसने घेतली होती.

दरम्यान, ज्यांच्याकडे पैसे घेणे होते ते पैसे देत नव्हते आणि ज्यांच्याकडून उसने घेतले होते ते थांबायला तयार नव्हते. या दरम्यान व्याज म्हणून श्रावण यांनी दहापट पैसे दिले होते. मात्र, कर्ज संपण्याचे नाव नव्हते. त्यामुळे श्रावण तणावात राहू लागले. गुंड महेंद्र कुरळकर व इतर आरोपी त्यांच्या घरी येऊन शिविगाळ आणि मारहाण होते. कुटुंबासमोर श्रावण यांचा अपमान केला जात होता. रात्री-बेरात्री आरोपी कधीही त्यांच्या घरी धडकत होते. त्यांची कार, दुचाकी वाहन आणि घरही विकण्यास भाग पाडले
त्यानंतरही आरोपी कुटुंबाला श्रावण यांची किडनी विकून पैसे वसूलण्याची धमकी देत होते. हे सर्व असह्य झाल्याने श्रावण यांनी सुसाईड नोट लिहित शकील लेआऊट परिसरात विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी सुसाईड नोट आणि श्रावणचे भाऊ अनिल यांच्या जबानीवरून गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे .


