ओव्हरटेक करताना टेम्पोची ट्रकला धडक ; तिघांचा मृत्यू , एक गंभीर जखमी

ओव्हरटेक करताना टेम्पोची ट्रकला धडक ; तिघांचा मृत्यू , एक गंभीर जखमी

नागपूर: नवीन काटोल नाका परिसरात भीषण अपघात घडला. ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटलेल्या टेम्पोची समोरून येणाऱ्या ट्रकशी समोरासमोर धडक झाली. या दुहेरी अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, या अपघातात एक मोपेडचालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अपघातात मृत्यू झालेले तिघे टेम्पो चालक रोशन कडूजी टेकाम, रमेश देहनकर आणि रामकृष्ण मसराम हे कृषी उपज पोहचवून परत काटोलकडे जात होते. दरम्यान, नागपूरहून कळमेश्वरकडे जाताना त्यांनी एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करताना त्यांचा टेम्पो समोरून येणाऱ्या ट्रकला समोरुन जोरदार धडकला. याचवेळी त्यांच्या टेम्पोने एका मोपेडलाही धडक दिली. या घटनेत मोपेड चालक माणिक महादेवराव बंधराम हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो पूर्ण चक्काचूर झाला आहे.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून ट्रक चालक शेख रफिक याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.