आईसमोरच मुलीचं अपहरण ; २५ हजाराची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडाला ४५ मिनिटांत पोलिसांनी केली अटक
नागपूर : कुख्यात गुंडाने आईसमोरच पाचवर्षीय मुलीचे अपहरण करीत २५ हजारांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत कळताच बेलतरोडी पोलिसांनी अवघ्या ४५ मिनिटांत तपासाची चक्रे फिरवित कुख्यात गुंडाला बेड्या ठोकल्या व मुलीची सुखरूप सुटका केली. सूर्या ऊर्फ मिलिंद बघेल (वय २९, रा. बुटीबोरी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिला हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षांच्या मुलीसह राहते. ती परिसरातील हॉटेलमध्ये काम करते. हॉटेलमध्ये काम करताना तिची सूर्यासोबत ओळख झाली. कालांतराने सूर्याने हॉटेलचे काम सोडले. खून प्रकरणात तो कारागृहात गेला. रविवारी महिला मुलीसह सीताबर्डी येथे खरेदी करायला गेली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास ती आपली बसने वर्धा मार्गावरील तृप्ती हॉटेलसमोरील बसथांब्यावर उतरली. ४.०५ वाजताच्या सुमारास सूर्या तेथे आला. त्याने महिलेच्या कडेवरील मुलीला हिसकावले व ऑटोत बसून मुलीला घेऊन बुटीबोरीच्या दिशेने पसार झाला. यादरम्यान सूर्याने महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मुलगी सुखरूप हवी असल्यास २५ हजार रुपये दे अन्यथा तिला ठार मारेल’, अशी धमकी दिली. महिला रडायला लागली. एका नागरिकाने ४.१५ वाजताच्या सुमारास बेलतरोडी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी सूर्याच्या मोबाइलचे लोकेशन काढले. बेलतरोडी पोलीस बुटीबोरीला रवाना झाले. बुटीबोरीत सूर्या हा मुलीसह ऑटोतून उतरला. तो मुलीला घेऊन पायी डोंगरगडकडे जात होता. याचदरम्यान पोलीसही तेथे पोहोचले. सूर्याला मुलीबाबत विचारणा केली. मुलगी रडत होती. पोलिसांनी लगेच मुलीची सुटका करीत सूर्याला अटक केली. पोलिसांनी अवघ्या ४५ मिनिटांत मुलीची सुटका करीत तिला आईच्या स्वाधीन केले.


