कुही तालुका : दुचाकीची कट लागल्यावरून वाद ; कुऱ्ह्याड, फावड्याने बापलेकास मारहाण, तिघांना अटक

दुचाकीची कट लागल्यावरून वाद ; कुऱ्ह्याड , फावड्याने बापलेकास मारहाण

(क्राईम रिपोर्टर) कुही  :- तालुक्यातील खैरलांजी येथे दुचाकीची  कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून चौघांनी बापलेकांसोबत भांडण करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कुऱ्ह्याड व फावड्याने वार करून जखमी केले आहे. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली असून आरोपींमध्ये  एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.

शनिवारी(दि.०५ जुलै ) वेलतूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा खैरलांजी येथील रवि कुरटकर नामक युवक हा शेतातून जनावरांसाठी दुचाकीने चारा घेऊन घरी आला.  दरम्यान काही वेळातच सकाळी ११ वाजताच्या सुमारास  गावातीलच  हेमराज भोयर,कैलास भोयर, राज भोयर व एक विधी संघर्षग्रस्त बालक असे चौघे ही आरडा ओरड  रवि यांच्या घरासमोर आले.  त्यावेळी हेमराज भोयर याच्या हातात कुऱ्ह्याड व कैलास भोयर याच्या हातात लोखंडी फावडा होता. आरडा ओरडा ऐकून रवि सह त्याचे वडील व आई असे तिघेही घराबाहेर येऊन पाहिले असता आरोपी हेमराज भोयर ,कैलास भोयर,राज भोयर व एक इतर अश्या चौघांनी यांनी रवि याच्यासोबत गाडीने कट का मारली म्हणून वाद सुरू केला. वाद एवढ्यातच थांबला नाही, तर आरोपी कैलास भोयर यांनी त्याच्या हातातील लोखंडी  फावड्याने रवि याच्या डोक्यावर घाव घालत त्याला जखमी केले. तर राज भोयर व इतर एक यांनी त्याला लाथा बुक्क्यांनी  मारहाण सुरु केली. झालेला प्रकार पाहता मुलगा रवि याला वाचवण्यासाठी वडील भगवान कुरटकर धावले असता आरोपी हेमराज भोयर याने त्याच्या हातातील कुऱ्ह्याडीने त्यांच्यावरही हल्ला चढवला. नजरेसमोर मुलगा व पतीला होत असलेली मारहाण पाहून रवि याची आई ललिता कुरटकर यांनी आरोपींना अडवण्याच्या प्रयत्न केला मात्र आरोपी त्यांनाही मारहाण करणार तोच ललिता यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. तसेच चारही आरोपी तिथून निघून गेले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले रवि कुरटकर व भगवान कुरटकर यांना रुग्न वाहीकेने नागपूर येथे घेऊन जात शासकीय मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहे. फिर्यादी ललिता भगवान कुरटकर यांच्या तक्रारी वरून आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन वेलतूर येथे 118(2), 3(5) BNS  प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वेलतुरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनात वेलतूर पोलीस करत आहेत.