कुही :- महा. राज्य परिवहन महामंडळाकडून नागपूर ते गोठणगाव बस सेवा मागील 50 वर्षांपूर्वीपासून निरंतर सुरू असून काही दिवसांपासून ही बस सेवा अचानक बंद करण्यात आली आहे. या मार्गाने कोणत्याही प्रकारची खाजगी वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी या मार्गांवरील प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
या मार्गाने चालणारी हि एकमेव बस असून ती रात्री उशिरापर्यंत नागपूरवरून यायची अन रात्री गोठणगावला मुक्कामी असायची. सकाळी पुन्हा निघायची त्यामुळे नागपूर ते पचखेडी पर्यंत रात्री उशिरापर्यंत शेवटच्या एक पर्याय मार्ग म्हणून या बसकडे पाहिले जात होते. गोठणगाव , राजोली,रेन्गातूर, कर्ह्यांडला, पांढरकोटा गावातील नागरिक या बसने दररोज प्रवास करीत होते. या परिसरातील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी जात होती. शंभरांवर विद्यार्थी मासिक पास धारक आहेत. या परिसरातील बाजारपेठ मांढळ असल्यामुळे कामानिमित्त दररोज ये-जा करावी लागते. नागपूर- गोठणगाव बस इंग्रजांच्या काळापासून निरंतर सुरू होती. परंतु काही दिवसांपासून ही बस सेवा बंद करून एसटी महामंडळाने या भागातील नागरिकांवर अन्याय केला आहे. ही बस सेवा पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू करावी अशी मागणी गोठणगावचे सरपंच मुकेश मारबते यांनी केली असून परिसरातील नागरिक, शाळकरी मुले-मुली, पालक व व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. आठ दिवसात बससेवा पूर्ववत सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याच्या इशाराही नागरिकांनी दिला आहे.