अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर बसने पडले महागात ; महिलेचे मंगळसूत्र हिसकावून युवक पसार
कुही :- बस स्थानकावर बसची वाट पाहत असलेल्या महिलेला गावाला सोडून देण्याचे आमिष दाखवून युवकाने महिलेच्या गळ्यातील दोन मंगळसूत्र लंपास केल्याची घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून महिलेच्या तक्रारीवरून कुही पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पुष्पा पांडुरंग चौधरी (६५ वर्ष), रा.मोह्खेडी, ता. मौदा या शनिवारी मुलीला भेटण्यासाठी मुलीच्या सासरी उमरेड येथे जाण्यासाठी मौदा बस स्थानकावर बसची वाट पाहत बसल्या होत्या. मात्र बस मध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्या दुसर्या बसची वाट पाहत असताना एक अनोळखी तरुण दुचाकी घेऊन त्यांच्या जवळ आला व कुठे जात आहे असे विचारले असता फिर्यादी पुष्पा यांनी नागपूर मार्गे उमरेडला जात असल्याचे सांगितले. तेव्हा दुचाकी चालक तरुण आपण मांढळ येथील रहिवासी असून उमरेड येथे कामानिमित्त जात असल्याने पुष्पा यांनाही उमरेड येथे सोडून देतो असे सांगितले. फिर्यादी पुष्पा यांनीही त्या अनोळखी तरुणावर विश्वास ठेऊन त्यांच्या गाडीवर बसल्या. तरुणाने सुरवातीला दुचाकी चहा पिण्याच्या बहाण्याने चापेगडी येथे थांबविली व तेथून कुही मार्गे मुसळगाव कडे नेत असताना हा उमरेड जात नाही असे फिर्यादी महिलेने म्हटल्यावर हा रस्ता तारणा मार्गे उमरेड जवळ पडतो असे सांगून मुसळगाव येथे पेट्रोलची विचारणी करण्यासाठी गाडी थांबविली मात्र स्थानिकांनी येथे पेट्रोल मिळत नाही कुहीला जावे लागणार असल्याचे सांगितले. तरुणाने गाडी परत फिरविली मात्र कुहीकडे परत न जाता सोनपुरी मार्गे नेऊ लागला व तितक्यात महिलेचे फोन वाजत असल्याने तरुणाने गाडी थांबवत महिला गाडीवरून खाली उतरून मुलीसोबत फोनवर बोलत असताना महिलेला मानेवर अळी असल्याचे सांगून मानेला हाथ लाऊन महिलेच्या गळ्यातील अंदाजे २८००० हजार किमतीचे 2 मंगळसूत्र हिसकावून महिलेला तेथेच सोडून दुचाकी घेऊन पळून गेला. महिलेने कुही पोलीस ठाणे गाठत अज्ञात मंगळसूत्र चोरणाऱ्या दुचाकीचालक विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.