कुही: अवैध रेती वाहतुकीचा ट्रक पकडला ; महसूल पथकाची कारवाई
कुही:- अवैध गौणखनिज वाहतुकीचा धंदा तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. अवैध रेती वाहतूक करून रेती तस्कर मोठ्या प्रमाणात पैसा कमवत शाषनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. यातच कुही तालुका महसूल पथकाने तालुक्यातील मौजा चिचघाट ते चापेगडी मार्गावर अवैध रेती वाहतुकीचा ट्रक पकडला असून या कारवाईने रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून तालुकाबाहेरून अवैध रेती वाहतुक होत असल्याच्या चर्चा होत्या. त्यात पोलीस प्रशासन व तालुका महसूल विभागाचे भरारी पथक यावर अंकुश लावण्यासाठी गस्तावर होते. दरम्यान मंगळवारी सायं. 7.30 च्या सुमारास कुहीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुही येथील गौनखनिज भरारी पथक गस्तीवर असताना मौजा चिचघाट ते चापेगडी दरम्यान रस्त्यावर ट्रक क्र. एमएच 40 बिजी 6551 हे रेती भरून जात असताना दिसून आले. लागलीच पथकाने ट्रक थांबवून रेतीचा परवाना मागितला असता परवाना नसल्याचे दिसून आले.

पथकाने ट्रक मालकावर पुढील कारवाईसाठी ट्रक कुही पोलिसांच्या स्वाधीन केला असून या कारवाईसाठी कुहीचे ठानेदार भानुदास पिदूरकर यांनी विशेष सहकार्य केले, भरारी पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आशिष आष्ठनकर, अंकुश पडोळे, अविनाश जाधव व प्रफुल कोचे आदी सहभागी होते.


