‘फेसबुक तुमचे फोटो वापरणार’..
संदेश खोटा अन् अफवा पसरवणारा..?
दोन दिवसांत अनेकांनी फेसबुकवर एकसारखी पोस्ट केली आहे. यात म्हटले आहे की, फेसबुकवर नवीन नियमावली उद्यापासून लागू होत आहे. यात तुमचे फोटो वापरण्याची परवानगी दिली जाईल. ही परवानगी नाकारण्यासाठी फेसबुकवर हा संदेश पोस्ट करा. याबाबत सायबर तज्ज्ञांशी जाणून घेतले असता या संदेशात तथ्य नसून, तो अफवा पसरवणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेसबुकवर पोस्ट होत असलेला हा मैसेज प्रत्यक्षात फेसबुकवर फिरणारा एक जुना आणि अफवा पसरवणारा आहे. यात दिलेली माहिती कायदेशीरदृष्ट्वा किंवा तांत्रिकदृष्ट्वा खरी नाही. केवळ फेसबूक वापरकर्त्यांना घाबरवून सोडण्यासाठी असा संदेश तयार करण्यात आला आहे. अनेक वापरकर्ते कोणतीही माहिती न घेता सरळसोटपणे तो व्हायरल करत आहेत.

काय म्हणतात तज्ज्ञ ?
फेसबूकचे नियम असे बदलत नाहीत.
– फेसबूक (मेटा) कथीही एखाद्या विशिष्ट तारखेला नवीन नियम जाहीर करून, फक्त पोस्ट न केल्याने तुमची माहिती वापरण्याचा अधिकार मिळवत नाही. नियम व धोरणे (टर्म्स अॅण्ड प्रायव्हसी पॉलिसी) बदलताना कंपनी तुमच्या अॅपमध्ये व ई-मेलद्वारे सूचना देते.
पोस्ट करून कायदेशीर संरक्षण मिळत नाही – फेसबुकवर “मी माझ्या फोटोंना परवानगी देत नाही” असा पोस्ट टाकल्याने कोणताही कायदेशीर परिणाम होत नाही, कारण प्रत्येकाने खाते उघडताना आधीच त्यांच्या टर्म्स ऑफ सर्व्हिसला मान्यता दिली असते.
अधिकृत स्त्रोतांवर याची पुष्टी नाही
ना मेटा/फेसबूक, ना कुठल्याही वृत्तवाहिनीने अशी तारीख किंवा वेळ जाहीर केली आहे. हा फॉरवर्ड अनेकदा वेगवेगळ्या वर्षात, थोडा बदल करून, लोकांना घाबरवण्यासाठी किंवा व्हायरल करण्यासाठी पसरवला जातो.
तुमच्या फोटोचा वापर कसा होतो ते आधीच ठरलेले आहे
– फेसबूक फक्त सेट केलेल्या प्रायव्हसी सेटिंग आणि त्यांच्या पॉलिसीनुसारच कंटेंट वापरू शकतो. याचा संबंध तुम्ही पोस्ट केलेल्या अशा ‘नो परमिशन’ स्टेटमेंटशी नाही.
हा मेसेज फेक आहे, तथ्यहीन आहे आणि याला कायदेशीर आधार नाही
तुम्हाला फेसबुकवर गोपनीयता राखायची असल्यास Settings – Privacy -Profile and Tagging मध्ये जाऊन पर्याय बदलणे हाच योग्य मार्ग आहे.
काय आहे फेक मेसेज ?
मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही. उद्या एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यावर रात्री ९:२० वाजता अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे आणि ही बातमी टीव्हीवर प्रसारित करण्यात आली आहे. फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात. ही वेळमर्यादा आज संपत आहे. कृपया हा संदेश कॉपी करा आणि तुमच्या प्रोफाइलवर एक नवीन पोस्ट तयार करून पेस्ट करा. जे असे करत नाहीत त्यांना परवानगी दिल्याचे मानले जाईल, गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतात. मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही.


