वाघाने केली कालवटीची शिकार ; परिसरात वाघाच्या दहशतीचे शेतीकाम ठप्प

वाघाने केली कालवटीची शिकार

परिसरात वाघाच्या दहशतीचे शेतीकाम ठप्प

कुही:- तालुक्यातील मौजा लोहारा  शिवारात शेतात बांधलेल्या कालवटीची  शिकार करत वाघाने ठार केले असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील लोहारा शेतशिवारात शेतकरी देविदास गजभिये रा. चिखलाबोडी यांचे शेत असून नेहमी  प्रमाणे शेतातील कामे आटोपून जनावरे शेतातच बांधून शेतकरी घरी परतले. व दुसर्‍या दिवशी (१४ जानेवारी ) रोजी शेतात येऊन पाहिले असता बांधलेल्या जनावरांपैकी एक कालवट दिसून आली नाही. आजूबाजूला शोध घेतला असता नजीकच बाजूला असलेल्या त्यांच्याच कापसाच्या शेतानजीक कालवट शिकार झाल्याच्या अवस्थेत दिसून आली. लागलीच याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या कालवटीमुळे शेतकरी गजभिये यांचे १६  हजारांचे नुकसान झाले आहे. वाघाच्या वावराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्याला तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील ईश्वर गजभिये, रूपचंद ठवकर, अभीमन अतकरी, देवानंद अतकरी, सुधाकर अतकरी, देविदास भगत व इतर नागरीक यांनी केली आहे.