दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या
कुही येथील दुचाकी चोरीची दिली कबुली
कुही :– शहरातील लक्ष्मी मंगल कार्यालयासमोर एका गॅरेजमध्ये दुरुस्ती करण्यासाठी टाकलेली दुचाकी (होंडा शाईन) भरदिवसा पळवणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपींमध्ये दोन सख्या भावांसह एकाचा समावेश आहे.
शहरातील नागपूर-आंभोरा मुख्य मार्गावरील लक्ष्मी मंगल कार्यालसमोर असलेल्या एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये गाडीमालक मोहन धोटे (वय-32) रा.कुही यांनी त्यांची एमएच ४० ए एल २९२४ क्रमांकाची होंडा शाईन दुरुस्ती साठी टाकली होती. गॅरेजमालक यांनी दुचाकी दुरुस्त करून गॅरेजसमोर चाबी लाऊन उभी ठेवली होती. व ते इतर दुचाक्या दुरुस्त करण्याकामी लागले. त्याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चाबी लावलेली दुचाकी गॅरेजसमोरून पळवली. गाडीमालक मोहन धोटे यांच्या तक्रारीवरून कुही पोलिसांत अज्ञात दुचाकी चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आरोपींच्या शोधात असताना नागपुरातील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरीची तक्रार दाखल होती. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेचे पथक संयुक्त रित्या तपास करत होते. सीसीटीव्ही व इतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणात लक्ष्मिकांत उर्फ आकाश संजयराव निनावे (वय-२९),शशिकांत संजयराव निनावे दोघेही रा.शक्तीमाता नगर, नागपूर व अंकित कृष्णा रेहपाडे (२४) रा.वाठोडा,नागपूर व इतर एक यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तर इतर ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यात लक्ष्मीकांत, शशिकांत व अंकित यांनी कुही शहरातील नागपूर-आंभोरा मुख्य मार्गावरील लक्ष्मी मंगल कार्यालसमोर असलेल्या मोहन धोटे यांची एमएच ४० ए एल २९२४ क्रमांकाची होंडा शाईन सुद्धा चोरल्याची कबुली दिली आहे. तीनही आरोपींविरुद्ध कुही पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.