पैशाच्या वादातून 25 वर्षीय तरुणाची घरापासून 20 मीटर अंतरावर धारदार शस्त्राने वार करून हत्या
नागपूर : रामटेक तालुक्यातील दुधाडा गावात पैशाच्या वादातून रात्री एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण बघायला मिळाले. मृत युवकाचे नाव हर्षल धनराज कोटांगले (वय २५) असून, त्याचे गावातील काही व्यक्तींशी आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ ते १२ दरम्यान हर्षल आणि आरोपींमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी हर्षलवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ही घटना हर्षलच्या घरापासून अवघ्या २० मीटर अंतरावर घडली, जेव्हा तो घरी परत येत होता, त्यावेळीच हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत हर्षलला तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नागपूरमधील मेयो हॉस्पिटलकडे हलवण्यात आले. यादरम्यान रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेतील आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे.

या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत युवकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. हर्षल कोटांगले हा युवक शांत स्वभावाचा असून त्याच्या अशाप्रकारे हत्येने संपूर्ण गाव हादरले आहे. स्थानिक लोकांनी पोलीस प्रशासनाकडे लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

