३ वर्षीय कार्तिक होळीपासून बेपत्ता, पोलीस, वनखाते अजूनही घेत आहेत शोध

३ वर्षीय कार्तिक होळीपासून बेपत्ता, पोलीस, वनखाते अजूनही घेत आहेत शोध

वर्धा: आर्वी तळेगाव रस्त्यावर मांडला गावाबाहेर असलेल्या जंगल भागात चार पाच कुटुंब राहतात. ते मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून या ठिकाणी आलेत. टेकडी व कालव्याच्या मधात राहुटी ठोकली. ही कुटुंबे भाडे तत्ववार शेती करीत उदरनिर्वाह भागवितात. त्यापैकीच एअरसिंग रुपसिंग चहल यांचा तीन वर्षीय कार्तिक हा मुलगा १२ मार्चपासून बेपत्ता आहे. घराजवळ शौचास जातो असे सांगून तो घराबाहेर पडला आणि अजून घरी आलेला नाही. चहल कुटुंबात पती, पत्नी व सहा मुलं आहेत. पिढीजात दारिद्र्य, हाताला काम नाही म्हणून वर्षभरपूर्वी ते या निर्जन स्थळी आले. गावचे सरपंच धुर्वे यांची जंगलात तळ्याकाठी शेती आहे. ती कसायला घेतली. परंतू पेरले ते उगवलेच नाही म्हणून आर्थिक फटका बदला. आता रोजमजुरी करतात.

घटनेच्या दिवशी वडील कामावर व आई जळावू लाकडे वेचण्यास जंगलात गेली. तीन महिन्याचे बाळ पाळण्यात व इतर मुलांना एकमेकांवर लक्ष ठेवण्यास सांगून आई घराबाहेर पडलेली. कार्तिक घराबाहेर पडल्यानंतर आई काही वेळाने घरी परतली तेव्हा कार्तिक दिसला नाही. म्हणून ती त्याच्या शोधात फिरू लागली. नंतर वडील व त्यांचे सहकारी पण शोधू लागले. पण मागमूस नं लागल्याने पोलीस व वन खात्यास कळविण्यात आले. गावकरी, पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी मिळून शोध सूरू केला. पण थांगपत्ता नाही. शोध घेत असतांना कार्तिक तर दिसून आलाच नाही पण ना कपडे, कुठे काही रक्त पण दिसले नाही. हा प्रकार अधिक रहस्यमय ठरत गेला.

वन कर्मचारी अजूनही जंगल पिंजून काढत आहे. पण शरीराचा कोणताच भाग किंवा दुर्गंधी दिसून येत नाही. बेपत्ता झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी होळी असल्याने अंधश्रद्धाविषयक सर्व बाबी तपासल्या पण आक्षेपर्ह असे काही दिसले नाही. या घटनेत अनेक बाबतीत अनुत्तरीत प्रश्न उपस्थित झाले आहे. पोलीस वन कर्मचारी अजूनही कार्तिकचा शोध घेत आहेत.