मित्राचा विरह सहन न झाल्याने, दोन दिवसांनी सचिननेही आयुष्य संपवलं
नागपूर: नवीन कामठी परिसरात दोन मित्रांनी आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सुपारी नगर न्यू येरखेडा येथील सचिन देशमुख (वय २८) या युवकाने आपल्या जिवलग मित्राच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी विष प्राशन करून आपलीही जीवनयात्रा संपवली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सचिन देशमुख आणि मोनल जगनाडे (२८) हे दोघे बालपणापासूनचे जिवलग मित्र, त्यांच्यात केवळ मैत्री नव्हे तर कौटुंबिक नातंही होतं. दोघेही एकत्र फिरत आणि प्रत्येक गोष्टीत एकत्र सहभागी होत. मात्र, काही महिन्यांपासून मोनल मानसिक तणावात होता. दारूचे व्यसन आणि वैवाहिक जीवनातील संघर्षामुळे मोनल खचून गेला होता. त्यातच पत्नी घर सोडून गेल्याने तो अधिकच एकटा पडला होता. आपले दुःख तो वारंवार सचिनकडे व्यक्त करत राहायचा. मोनलने मानसिक तणावातून गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. या घटनेचा जबरदस्त मानसिक आघात सचिनवर झाला होता. मित्राच्या निधनाने तो पूर्णपणे खचला होता.

त्याने जवळच्या मित्रांना सांगितले की, “माझा मित्र मला बोलावतोय…तो माझ्याशिवाय राहू शकत नाही… मला त्याला भेटायला जायचे आहे.” या भावनिक अवस्थेत सचिनने विष प्राशन केले. आईने वेळीच त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद नवीन कामठी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दोन दिवसांत दोन मित्रांनी आपलं आयुष्य संपवण्याचा पर्याय स्वीकारल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.


