कुहीत  डेंगू रुग्णांच्या संख्येत वाढ

 

कुही :- कधीकाळी  स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर राहून देश पातळीवर आयोजित स्वच्छता सर्वेक्षणात सहभागी होत बक्षीस मिळवणाऱ्या कुही नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाला आजघडीला स्वच्छतेचा जणू विसर पडल्याचे  दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील बहुतांशी नाल्यांची सफाईच झाली नसून गेल्या महिन्याभरात शहरात डेंगू सह तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कुही नगरपंचायत तर्फे शहर स्वच्छतेसाठी घनकचरा व व्यवस्थापन चे कंत्राट एका खाजगी कंपनी  देण्यात आले आहे. या अंतर्गत शहरातील रस्ते सफाई ,नाली सफाई, कचरा संकलन, शौचालय सफाई सह  कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सदर कंपन्याला दिले आहे.  मात्र गेल्या दोन वर्षांपासून शहरातील बहुतांशी नाल्यांची सफाई झाली नसून अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नाल्यांमध्ये गाळ जमा झाला आहे. विशेष म्हणजे शहरातील बहुतेक नाल्या भूमिगत स्वरूपातील असल्याने केवळ चेंबर सफाई करायचे असूनही त्याची सफाईकडे संबंधित कंत्राटदार कानाडोळा करत असल्यने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नाल्यांमध्ये  गाळामुळे ठिकठिकाणी पाणी जमा झाले असून यात मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत आहे. तर सांडपाण्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

 

  • डेंगू रुग्णांची संख्या वाढली

 

दोन वर्षाआधी तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणावर डेंगू रुग्णांची संख्या वाढली होती. जवळपास तशीच परिस्थिती गत महिन्यात दिसून येत असून शहरात तापाचे रुग्ण वाढले आहे. तर खाजगी पॅथॉलॉजी मध्ये  ४० च्या वर डेंगू रुग्णांची नोंद झाली आहे.

 

  • शासकीय यंत्रणा अद्यापही अनभिग्न

 

याबाबत कुहीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चकोले यांना विचारणा केली असता महिनाभरात तालुक्यात कुठल्याही डेंगू रुग्णाची नोंद नसल्याचे सांगितले. तर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय  अधीक्षक डॉ. पाटील या सुट्टीवर असल्याने प्रभारी म्हणून कारभार पाहणारे डॉ. संदीप आखरे यांनाही विचारपूस केली असता ग्रामीण रुग्णालय येथे एकही डेंगू रुग्ण नसून तापाचे रुग्ण वाढल्याचे सांगितले.

तापाचे रुग्ण पाहता खबरदारी म्हणून तपासण्या सुरु आहेत. आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन पाहणी केली असता काही घरातील कुलर व फ्रिजच्या मागील टपात डास अळी आढळून आली आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून स्वच्छ पाण्याची साठवणूक असलेले भांडे व टप साफ करावे.       

–  डॉ. चकोले (तालुका आरोग्य अधिकारी)