राज्यात वातावरणात होतोय बदल
ऐन थंडीत पावसाची शक्यता; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आर्द्रता वाढणार
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच राज्यात डिसेंबरच्या पूर्वार्धात कडाक्याची थंडी पडली. राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा चार ते पाच अंश सेल्सिअसवर पोहचला. गोठवणाऱ्या थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत होत्या, पण आता या थंडीचा जोर काहीसा ओसरत चालला आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे आणि आता हवामान खात्याने चक्क पावसाची शक्यता वर्तवली आहे.

अधिवेशनाची सुरुवातच कडाक्याच्या थंडीने झाली. त्यामुळे या थंडीची सवय नसलेल्या आणि राज्यातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या राजकीय, शासकीय व्यक्तींना ही थंडी चांगलीच बाधली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात सात अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.
-
विदर्भात हलक्या सरींची शक्यता
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार असून, पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. परिणामी, इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून, पुढील दोन दिवसांत राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
-
किमान तापमानात वाढ
किमान तापमानात वाढ झाली असून, विदर्भात येत्या २४ व २५ डिसेंबरला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आर्द्रता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
-
राज्यातील काही भागात गारठा कायम
काही दिवसांत हाडे गोठवणारी थंडी होती. त्यावेळी चार ते पाच अंश सेल्सिअस वर असणारे किमान तापमान आता ११ ते १५ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. राज्यातील काही भागात गारठा कायम असला तरी कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा काहीसा वाढलाय.
-
तीन दिवसांत पावसाची शक्यता
पश्चिमी प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून, नाताळ सणात म्हणजे २५ ते २९ डिसेंबर (बुधवार ते रविवार) पाच दिवसा दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही आहे. त्यातही विशेषतः गुरुवार, २६ ते शनिवार दि.२८ डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसात पावसाची ही शक्यता अधिक जाणवत आहे.
-
पिकांवर अळी, बुरशीच्या आक्रमणाची भीती
संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित सहा असे एकूण १७ जिल्ह्यांत वाहणाऱ्या थंड व कोरड्या वान्यामुळे तेथे मात्र माफक थंडी जाणवणारच आहे, असे वाटते. कांदा, गहू, हरबरा पिकावर अळी, किडी, बुरशी, माव्याचे आक्रमण होऊ शकते. तर किड व बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्या लागण्याचीही शक्यता आहे.



