युवकाने घरात शिरून चक्क निवृत्त हवालदारालाच लुटले

युवकाने घरात शिरून चक्क निवृत्त हवालदारालाच लुटले

नागपूर : जवाहर नगर येथील रहिवासी महेंद्रकुमार वर्मा (८२) हे शहर पोलिस खात्यात हवालदार या पदावर होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. फिर्यादी मीना वर्मा (६२) या वकिल आहेत तर मुलगा डॉक्टर आहे. पीडित वयोवृध्द आणि आजारी असल्याने त्यांच्यासाठी ‘केअर टेकर’ नियुक्त केले आहे. आठ वर्षांपासून केअरटेकर त्यांची काळजी घेत आहे. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी केअर टेकर घरी आले. त्यांनी वर्मा यांना व्हरांड्यात व्हिल चेअरवर बसविले. त्यांची आंघोळ घालायची असल्याने पाणी गरम करण्यासाठी ते मागच्या भागात गेले.

मुलगा डॉक्टर, त्यांची पत्नी आणि मुले तसेच फिर्यादी मुलगी आतमधल्या खोलीत झोपले होते. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आरोपी तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या घरात शिरला. काही कळण्याआधीच पीडिताच्या गळ्यातील सोनसाखळी, सोन्याचा लॉकेट आणि पाच हजार रुपये घेऊन पळाला. केअर टेकर त्यांना आंघोळ घालण्यासाठी व्हरांड्यात आले असता लुटपाटीचा प्रकार उघडकीस आला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जवळपास 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये एक संशयीत युवक दिसला. ओळख पटविल्यानंतर त्याच्या मोबाईल नंबर वरून घराचा पत्ता घेतला. तो मानेवाडा परिसरात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

पीडिताचा मुलगा डॉक्टर असून त्यांचे रूग्णालय आहे. त्याच रूग्णालयात आरोपी ओमप्रकाश हा दोन वर्षांपासून अटेंडन्सचे काम करतो. ओमप्रकाशने बीएसस्सी पर्यंत शिक्षण घेतले आहेत. त्याचे वडिल प्रॉपर्टी डीलिंगचे काम करायचे. त्यात ते कर्ज बाजारी झालेत. त्यांच्यावरील कर्ज फेडण्यासाठी लुटीची योजना आखली, असे पोलिस चौकशीत त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरु आहे.