पत्नीचा मित्राशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून चाकूने भोसकून मित्राचा खून
भंडारा : मनात संशयाने घर केले की संसार आणि नाती या सर्वांचीच माती होते. अशीच एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. त्या जोडप्याचा सुखी संसार सुरू होता. मात्र कालांतराने दोघांमध्ये खटके उडू लागले. पत्नीचे आपल्याच जिवलग मित्रासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय बळावला आणि एके दिवशी नवऱ्याने मित्रालाच संपवून टाकले. ही थरारक घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावात घडली. अंकुश साठवणे (वय ३८) असं मृतकाचे नाव आहे. मृतक हा देव्हाडी ग्रामपंचायतचा सदस्य होता. तर, मुन्ना बिरणवार (वय ३२) असं आरोपीचे नाव असून त्याला तुमसर पोलीसांनी चाकूसह ताब्यात घेतलं आहे.
आरोपी आणि मृतक यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मात्र, आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले. दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झालं होतं. दोघांमधील वाद मिटावा आणि दोघांमध्ये समेट घडावा यासाठी आज दोघेही मृताच्या घरी एकत्र आलेत. मात्र, आरोपीने जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूने मित्रावर सपासप वार करायला सुरुवात केली.

अंकुश साठवणे यांच्यावर चाकुने हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षा धावून आली. यात ती ही जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आरोपीला तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहे.


