पोलिसांनी गाडीतून जप्त केला देशी कट्टा; एक आरोपी अटकेत, दुसरा फरार  

पोलिसांनी गाडीतून जप्त केला देशी कट्टा; एक आरोपी अटकेत, दुसरा फरार  

भंडारा : तुमसर तालुक्यातील खापा चौकात उभ्या असलेल्या टवेरा गाडीत पोलिसांनी एक देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्त केल्या. तुमसर पोलिसांच्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली असून याचा संबंध आयपीएल जुगाराशी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य एक आरोपी फरार आहे.

देशी कट्टासह दोन तरुण खापा चौकात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता कट्टा आणि दोन काडतूस सापडल्या. टवेरा गाडीत दोन युवक रामटेकहून येत होते. तुमसर तालुक्यातील खापा चौकात गाडी थांबवून ते दोघे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. पोलीस कारवाई नंतर या गाडीतील दोघांपैकी एक आरोपी फरार झाला असून दुसऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सुमित संजय सोनवाने रा. रामटेक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणाचा आयपीएल जुगाराशी खरोखरच काही संबंध आहे का ? जर स्वरक्षणासाठी  आरोपींनी देशी कट्टा ठेवला असेल तर त्याची गरज का पडली ? या दोघांनी देशी कट्टा कुठून घेतला ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.  तुमसर पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,  फरार आरोपीच मुख्य सूत्रधार असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तो सापडल्यावरच यामागे काय हेतू होता हे कळेल.  सध्या त्याचा शोध आणि तपास सुरू आहे.