एकतर्फी प्रेमाचा दुःखद अंत; वर्गमैत्रीणीच्या वडिलांची निर्घुण हत्या

एकतर्फी प्रेमाचा दुःखद अंत; वर्गमैत्रीणीच्या वडिलांची निर्घुण हत्या

नागपूर: एकतर्फी प्रेमातून लग्नास अडथळा ठरत असलेल्या वर्गमैत्रीणीच्या वडिलांची दिवसाढवळ्या भर चौकात धारदार शस्त्राने वार करुन निघृण हत्त्या करण्यात आली. ही घटना इमामवाडा पोलीस हद्दीतील जातटरोडी येथे बुधवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.नरेश वागदे (५५), रा. इंदिरानगर, जाटतरोडी असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. निलेश ऊर्फ नाना विनोद मेश्राम (३५), रा. रामबाग असे आरोपीचे, तर ईश्वर ऊर्फ जॉकी ऊर्फ जैकी सोमकुंवर (२८) रा. रामबाग असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेशसह त्याच्या मित्रालाही अवघ्या २ तासांत अटक केली. आरोपी निलेश मेश्राम हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या चार वर्षापासून आरोपी युवक युवतीला त्रास देत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश मेश्राम हा बारावीत असताना त्याची निशा (बदललेले नाव) नावाची वर्गमैत्रीण होती. दरम्यान २०१६ पासून निलेश हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. मात्र, तिला याची कल्पना नव्हती. वडील व आई खाजगी काम करायचे. तर दोन बहिणींसाठी तिच भाऊ होती. शिक्षण पूर्ण करुन उच्च पदावर नोकरी करण्याचे तिचे स्वप्न होते. दरम्यान तिचा वर्गमित्र निलेश हा वर्ष २०१९ मध्ये हत्येच्या गुन्ह्यात कारागृहात गेला. यादरम्यान निशा ही एमबीए शिक्षण पूर्ण करून नोकरीवर लागली. तर निलेश हा वर्ष २०२१ मध्ये कारागृहाबाहेर आला. तो बाहेर येताच निशाला भेटायला गेला. यावेळी त्याने तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तिने स्पष्ट शब्दात त्यास नकार दिला. वर्गमैत्रिणीचा हा नकार त्याला पचवता आला नाही. आणि तो थेट अंगावर आला. त्यामुळे तिने वडिलांना सोबत घेत इमामवाडा पोलिस ठाणे गाठले. मात्र निलेश हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने तिने तक्रार मागे घेतली. त्यानेही पोलिस ठाण्यात त्रास देणार नसल्याचे लिहून दिले.

गेल्या काही दिवसांपासून तो निशाला लग्न करण्यासाठी विचारणा करीत होता. ती वारंवार नकार देत होती. तिने निलेश हा त्रास देत असल्याची तक्रार वडिलांकडे केली. एकेदिवशी निशाच्या वडिलांनी त्याला फटकारले आणि येथेच वर्गमैत्रीणीच्या वडिलांचा काटा काढण्याची खुनगाठ त्याने मनाशी बांधली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याने तिच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. मात्र दार न उघडल्याने आरोपी निलेश हा आपल्या साथीदारांसह आल्या पावली परतला. यावेळी त्याने निशाच्या वडिलांचा गेम करण्याची धमकी दिली. एकतर्फी प्रेमात वेडापिसा झालेल्या आरोपी निलेशने वर्गमैत्रीणीचे वडिल नरेश यांचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी दुपारी दोन वाजता निलेश हा मित्र ईश्वर ऊर्फ जॅकी सोमकुवर याच्यासह दुचाकीने जाटतरोडी पोलिस चौकीजवळ आला. दोघांनीही नरेश यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवून हत्या केली. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली.