नागपूर : महिलेचा खून प्रकरणात न्यायालयाने आरोपी पती-पत्नीस ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

नागपूर : महिलेचा खून प्रकरणात न्यायालयाने आरोपी पती-पत्नीस ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

नागपूरः व्याजाने दिलेले पैसे परत मागणाऱ्या महिलेचा एका दाम्पत्याने घरात खून केला. त्या महिलेचा मृतदेह फ्रिजच्या थर्माकॉलमध्ये ठेवून जंगलात फेकून दिला होता. या हत्याकांडाचा कपीलनगर पोलिसांनी छडा लावून दाम्पत्याला अटक केली होती. मात्र, एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडल्यामुळे आरोपी दाम्पत्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सनी हिरालाल सोनी आणि सोनल ऊर्फ सुवर्णा सनी सोनी अशी दोषी दाम्पत्याचे नाव आहे.

२ मार्च २०२२ मध्ये नागपूरमधील एका नामांकित शाळेच्या बसवर महिला वाहक असलेल्या दीपा दास यांची सोनी दाम्पत्याने हत्या केली होती. नागपूरमधील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील उप्पलवाडी परिसरात दीपा यांचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरुन निर्जनस्थळी फेकून देण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला. हे हत्याकांड सनी आणि सोनल या पती-पत्नीने मिळून केल्याचे समोर आले होते. व्याजाने दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तगादा लावल्याने सोनी दाम्पत्याने तिचा खून केल्याचा आरोप होता. कपिलनगर पोलिसांनी या हत्याकांडाचा कसून तपास केला. एकाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने सोनल आणि सनी यांना जन्मठेपेची शिक्षा दिली.