पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; वाद 2021 चा अन् हत्या 2025 मध्ये

पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; वाद 2021 चा अन् हत्या 2025 मध्ये

ऑक्टोबर 2021 मध्ये हर्ष आणि त्याचे साथीदार अमोल उर्फ बादल, प्रतिक खोंडेकर, आदित्य पारधी, मोहन पटेल आणि इतरांनी डीजेच्या तालावर नाचताना झालेल्या वादातून अभिषेक रवींद्र हुमणे याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

नागपूर : नागपुरात खुनाच्या घटना थांबण्याचे नाव नाही. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पारडी ठाण्यांतर्गत एका तरुणाची हत्या करण्यात आली. 5 आरोपींनी पूर्ववैमनस्यातून शस्त्रांनी सपासप वार करून तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले आणि पसार झाले. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. खुनाचा बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे. पोलिसांनी रात्री उशिरा पाचही आरोपींना अटक केली.हर्ष राजू शेंडे (वय 24, रा. ब्रम्हानंद कॉलनी, हिवरीनगर) असे मृताचे नाव आहे. आरोपींमध्ये सौरभ बोरकर, दुर्गेश लारोकर, आशिष मरकाम, साहिल पटेल आणि सुनिल खोब्रागडेचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये हर्ष आणि त्याचे साथीदार अमोल उर्फ बादल, प्रतिक खोंडेकर, आदित्य पारधी, मोहन पटेल आणि इतरांनी डीजेच्या तालावर नाचताना झालेल्या वादातून अभिषेक रवींद्र हुमणे (वय 21, रा. भांडेवाडी) याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी अभिषेकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दुर्गेशच्या तक्रारीवरून आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात हर्षला अल्पवयीन असल्याचा लाभ मिळाला आणि त्याची या प्रकरणातून सुटका झाली होती. अमोलचे मित्र सौरभ आणि दुर्गेश यामुळे चिडलेले होते. तेव्हापासून त्यांच्यात वैमनस्य सुरू होते. याच वादातून हर्ष शेंडे याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.