खळबळजनक ! मृत्यूनंतर काय होतं हे जाणून घेण्यासाठी ‘तिने’ केली आत्महत्या; हाताची नस नंतर गळाही कापला
रुचिकाचे वडील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पदावर अधिकारी आहेत. आई गृहिणी आहे. छत्रपतीनगर परिसरात दोन माळ्यांच्या इमारतीत तळ माळ्यावर ती आई-वडिलांसोबत राहत होती.
नागपूर : एका 17 वर्षांच्या मुलीने मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी आत्महत्येचा मार्ग निवडला. आधी तिने स्वतःच्या हाताची नस कापली आणि नंतर गळा चिरला. ही थरारक आणि विचित्र घटना धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत सोमवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.रुचिका (बदलले नाव) ही बारावीची विद्यार्थिनी होती. तिला मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्याचा छंद होता. रुचिकाचे वडील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पदावर अधिकारी आहेत. आई गृहिणी आहे. छत्रपतीनगर परिसरात दोन माळ्यांच्या इमारतीत तळ माळ्यावर ती आई-वडिलांसोबत राहत होती. दुसऱ्या माळ्यावर रुचिकाचे काका हे कुटुंबासह राहतात. रविवारी रात्री रुचिका आपल्या खोलीत झोपायला गेली होती. मध्यरात्रीनंतर तिने चाकूने हाताची नस कापून ‘क्रॉस’चे चिन्ह बनवले. त्यानंतर तिने गळ्यावरून चाकू फिरवत गळा कापला.सोमवारी सकाळी तिचे कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल होते. 6 वाजताच्या सुमारास आई तिला उठविण्यासाठी खोलीत गेली असता रुचिका रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. आईची आरडा-ओरड एकून वडील खोलीकडे धावले. काका आणि आजीही आली.

स्टोन ब्लेड चाकूचा उपयोग
रुचिकाने आत्महत्या करण्यासाठी स्टोन ब्लेड चाकूचा उपयोग केला. हा चाकू दगड आणि लाकडापासून बनलेला असतो. बाजारात हा चाकू सहजरित्या मिळत नाही. तिच्याकडे हा चाकू कसा आला याबाबत कुटुंबीयांना काहीही माहिती नाही. त्यामुळे रुचिकाने हा चाकू ऑनलाईन मागवल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रुचिकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. 5 पानांच्या या चिठ्ठीत अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून याबाबत अधिक माहिती दिली गेली नाही.



