साळवा येथील तरुणाची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या
कुही : दारूच्या नशेत एका तरुणाने घराच्या बाजूला असलेल्या बदामाच्या झाडाला पलगांचा नेवार बांधून त्याचा गळफास तयार करून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना साळवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला शुक्रवार, दि.२८ मार्चला सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान मृतकाच्या घरी घडली. संजय श्रीराम शिवरकर (वय ४१) रा.साळवा असे आत्महत्या करणाऱ्या तरुण इसमाचे नाव आहे.
संजय हा दारुड्या होता. तो नेहमी दारू पीत असून नेहमी नशेत राहत होता. यातच त्याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. घरावरील स्लॅब उद्याच पडणार होता. यात तो दारू पिऊन राहत असल्याने पती-पत्नीत वाद होत असे. आज ही हा प्रकार घडला व त्याने दारूच्या नशेत झाडाला नेवार बांधला व गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान घरात घटनेची माहिती होताच त्याला गळफासातून बाहेर काढून लागलीच प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा येथे उपचारार्थ नेण्यात आले. परंतु तेथील डॉ. रघटाटे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

गावातील काही लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे या तरुणाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु काही जागरूक नागरिकांनी कुही पोलिसांना माहिती दिली. मांढळ बिटचे जमादार सुधीर ज्ञानबोण्डवार व शिपाई रणजित घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे शव ताब्यात घेत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास कुही पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात सुधीर ज्ञानबोण्डवार करीत आहे.


