तहसील कार्यालय परिसरात रंगेहात पकडले
कुही:- सातबाऱ्यातील नाव दुरुस्त करण्यासाठी लाच मागणाऱ्या पटवाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या पथकाने 1500 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. या कारवाईने कुहीच्या तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.
विजय गजानन कामठीकर (26) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विजय हा कुहीत पटवारी असून त्याच्याकडे कुही तालुक्यातील हरदोली(नाईक) साझ्याचा कार्यभार आहे. तक्रारकर्त्याचा आईची हरदोली (नाईक) साझ्यात शेतजमीन असून आहे. या शेतजमिनीवरील सातबाऱ्यावरील आईच्या नावात तक्रारकर्त्याला दुरुस्ती करायची होती. त्यासाठी त्याने विजयशी संपर्क केला. विजयने तत्काळ काम करुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यासाठी 1,500 रुपयांची लाच मागितली. पीडित व्यक्तीला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर आणि अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोनि वर्षा मते, सफौ सुरेंद्र सिरसाठ, पोहवा वंदना नगराळे, आशू श्रीरामे, भागवत वानखेडे आणि प्रिया नेवारे यांनी बुधवारी सायंकाळी कुही तहसील कार्यालयात सापळा रचला. तक्रारकर्त्याने फिनापथिलिन पावडर लावलेले नोट विजयला दिले. त्याने पैसे घेताच एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध कुही पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.