Bhandara Crime: फिल्मी स्टाईल हत्येने भंडारा हादरलं ! दारूच्या नशेत पैशांचा वाद, तळ्यात बुडवून घेतला जीव
भंडाऱ्यात पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केली. दारूच्या नशेत वाद वाढल्याने आरोपी नारायण मेश्रामने नरेश दुनेदारला तळ्यात बुडवून ठार केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
- भंडाऱ्यात फिल्मी स्टाईल हत्या
- तळ्यात बुडून केले ठार
- आरोपीला अटक
भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक फिल्मी स्टाईल हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली (बु) गावातील शेतशिवारात पैशांच्या वादातून एकाने दुसऱ्याला तळ्यात बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत विरली (बु) येथील नरेश दुनेदार (४५) याचा मृत्यू झाला आहे. तर याप्रकरणात नारायण मेश्राम (४२) या आरोपीला लाखांदूर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
काय घडलं नेमकं?

मृतक नरेश आणि आरोपी नारायण हे दोघेही दुपारच्या सुमारास दारूच्या नशेत स्थानिक तळ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान आरोपी मेश्राम याने नरेशवर पैश्यांची चोरी केल्याचा आरोप केला. या आरोपावरून दोघांमध्ये जोरदार वाद आणि मारहाण झाली. या भांडणात संतापलेल्या नारायण मेश्रामणे नरेशला तळ्यात ओढत नेऊन पाण्यात बुडवून ठार केले.
दरम्यान घटनास्थळावरून उपस्थित काही नागरिकांनी हे बघितलं आणि लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पवनी शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी लाखांदूरचे ठाणेदार यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. आरोपीला ताब्यात घेऊन हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखांदूर पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.







