अज्ञात चोरट्यांनी फोडले किराणा मालाचे दुकान ; नगदी ७०००० हजार रुपये लंपास
कुही : शहरातील मुख्य रस्त्यावर शारदा चौक नजीक असलेल्या पंकज किरणा स्टोअरचे शटर वाकवून चोरी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरीचा घटनेमुळे व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार पंकज करंडे यांचे कुही येथे मुख्य बाजारपेठेत पंकज किरणा स्टोअर नावाने किराणा मालाचे दुकान आहे. व दुकानाच्या वरच्या मजल्यावर ते आपल्या परिवारासोबत राहतात. ते सकाळी ७ वाजता दुकान उघडून रात्री ९ वाजता बंद करतात. नेहमीप्रमाणे २९/५/२५ ला रात्री दुकान बंद करून ते आपल्या वरच्या मजल्यावरील घरी गेले. शनिवार सकाळी ६ वाजता घराचे बालकनीत उभे असता त्यांना दुकानासमोर आजूबाजूचे लोक उभे असल्याचे दिसले. काय झाले विचारले तेव्हा त्यांच्या दुकानाचे शटर उघडे असल्याचे कळले. खाली आले असता दुकानाचे शटर अर्धवट उघडे होते. आत जावून बघितले असता काउनटरचा बाजूला प्लास्टिक डब्यात ठेवलेले ७०००० हजार रुपये चोरी गेल्याचे दिसले. ते पैसे त्यांनी आठवडाभरातील विक्रीतून किराणा मालाचे व्यापाऱ्यास देण्याकरिता जमा केले होते.

चोरीची माहिती मिळताच कुही पोलीस घटनास्थळी दाखल होत दुकानाची पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांचे मार्गदर्शनात कुही पोलीस करीत आहे.

