माजी आमदार राजू पारवे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
नागपूर :- विधानसभा निवडणुकीत उमरेड मतदार संघातून माघार घेतल्यानंतर माजी आमदार राजू पारवे यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुरुवातीला काँग्रेसमध्ये, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेत आणि आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
राजू पारवे मुळचे कॉंग्रेसचे. या पक्षाकडून ते २०१९ मध्ये उमरेडचे आमदार म्हणून निवडून आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षाकडून ते रामटेक लोकसभा निवडणूक लढले. त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर सेनेकडून उमरेड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने त्यांनी पक्षाकडे अर्ज केला होता. मात्र या मतदार संघातून भाजपने माजी आमदार सुधीर पारवे यांची शेवटच्या क्षणी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राजू पारवे यांनी सुधीर पारवे यांचा पाठिंबा जाहीर करुन निवडणुकीतून माघार घेतली.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी प्रचार मिरवणुकीच्या निमित्ताने नागपूरला आले होते. फडणवीस यांनी पारवे यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा घालत पक्षात प्रवेश करुन घेतला आणि त्यांचे स्वागत केले. भाजपच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांना या पक्ष प्रवेशाची माहिती नसल्यामुळे सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमरेड राखीव मतदारसंघातून राजू पारवे कॉंग्रेसचे उमेदवार होते व त्यांनी भाजपचे सुधीर पारवे यांना पराभूत करून ही जागा दहा वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली होती.