विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; “ही” शहरे आहेत रडारवर
नागपूर : विदर्भातील काही शहरांमध्ये तापमानात वेगाने वाढ होत आहे. अकोला, ब्रम्हपूरी, चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगाने चढत आहे. तर त्याचवेळी नागपूर आणि वर्धा ही शहर देखील तापू लागली आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने विदर्भातील काही शहरांना आजपासूनच तीन दिवसपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात यंदा होळीच्या आधीपासूनच साधारणपणे फेब्रुवारीच्या मध्यान्हापासूनच उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि त्याचवेळी तापमान ४० अंश सेल्सिअस पलीकडे गेले. संपूर्ण राज्यातच उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहेत.
मार्च महिना सुरू होताच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात अनेक शहरांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. तर उर्वरित शहरांमध्ये देखील कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. विशेषतः विदर्भातील नागपूर,अकोला. चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने विदर्भातील अनेक भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

अकोला आणि चंद्रपूर या दोन शहरांमधील तापमान प्रामुख्याने वाढणार असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यावर्षी तापमान सामान्यपेक्षा तीन ते चार अंश अधिक राहणार आहे, ज्यामुळे उन्हाळ्याचा तडाखा अधिक तीव्र जाणवेल. विदर्भातील उन्हाळा तसाही अधिकच तापलेला असतो. याच उन्हाळ्यात कमाल तापमानाचे वेगवेगळे उच्चांक विदर्भातील काही शहरांमध्ये नोंदवण्यात आले आहे. प्रामुख्याने चंद्रपूर, अकोला, ब्रम्हपूरी या शहरांमध्ये कमाल तापमान अधिक राहीले आहे. तर नागपूर, वर्धा या शहरांमध्ये देखील तापमानाचे उच्चांक नोंदवले गेले आहेत


