पालकांनो खबरदारी घ्या : होळीतील रासायनिक रंगामुळे डोळे व त्वचाविकाराचा धोका  

पालकांनो खबरदारी घ्या : होळीतील रासायनिक रंगामुळे डोळे व त्वचाविकाराचा धोका  

नागपूर : होळी हा वाईट प्रवृत्तीवर मात करणारा, मनोमिलन घडविणारा, रंगाची उधळण करणारा सण म्हणून ओळखला जाते. परंतु या सणात हल्ली रासायनिक रंगाचा वापर वाढला आहे. हे रंग डोळे व त्वचेवर वाईट परिणाम करू शकतात. या रंगाच्या धोक्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. होळीच्या दिवशी रासायनिक रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

लाल रंग हा मरक्युरी सल्फाइटपासून तयार होतो. यामुळे त्वचेचे आजारासह कर्करोगही संभावतो. जांभळा रंग क्रोमिअम आणि ब्रोमाइटपासून तयार होतो. हिरवा रंग कॉपर सल्फेटपासून तयार होतो. हे रंग वापरल्यास त्वचेची जळजळ होते. डोळ्यात रंग गेल्यास ते निकामीही होण्याची शक्यता असते. दरम्यान एकंदरीत स्थिती बघता सगळ्याच रंगात जीवघेणे रासायनिक पदार्थ असतात. त्यामुळे हे रंग मुलांच्या नाका- तोंडात, कानात, डोळ्यात गेल्यास त्यांनाही विविध आजार संभावतात. धोके टाळण्यासाठी प्रत्येक पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे .

पालकांनी रंग खेळणाऱ्या मुलांच्या अंगाला खोबरेल तेल लावून द्यावे. केसालाही तेल लावावे. डोक्याला, केसांना इजा होऊ नये म्हणून स्कार्फ, टोपी वापरावी. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी साधा चष्मा वापरावा. केमिकल रंग नखांतून शरीरात प्रवेश करू शकतात म्हणून वाढलेली नखे कापून टाकावी. संपूर्ण अंग झाकेल, असे सुती कापड परिधान करावेत. जेवणापूर्वी स्वच्छ हात धुवावेत. नैसर्गिक रंग वापरण्यासाठीच सर्वांना उद्युक्त करावे.