दुचाकी स्लिप होऊन कठड्यावर धडकली ; एकाचा मृत्यू तर एक जखमी
कुही:- उमरेड-नागपूर मार्गावरून नागपूर कडे जात असताना कुही फाटा उडाण पुलावर भीषण अपघात झाला. रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जखमी असल्याची माहिती आहे.
सोमवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास कुही पोलीस स्टेशन हद्दीतील खापरी(कुरूटकर) ता.उमरेड येथील चंदू नामदेव डोंगरे (वय-35) व आकाश अविनाश वाघमारे (वय-26) हे दोन्ही युवक नेहमी प्रमाणे त्यांचा एमएच 31 आरए 5935 या दुचाकीने विहिरगाव येथील एका कंपनीत कामावर जायला निघाले. दरम्यान उमरेड-नागपूर मार्गावरील कुही फाटा उड्डाण पुलावर पावसामुळे गाडी स्लिप झाली. गाडी स्लिप होऊन थेट पुलाच्या कठड्याला जाऊन जोरात धडकली. यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तेथील
डॉक्टरांनी दुचाकीचालक चंदू डोंगरे याला तपासून मृत घोषित केले तर जखमी आकाश वाघमारे याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून
या प्रकरणाचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरीचंद्र इंगोले करीत आहेत.

