जुगार अड्ड्यावर धाड ; सहा जणांवर कारवाई
कुही:– कुही पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या एका घरात ताश पत्त्यांवर पैसे लावून हार जितीचा खेळ खेळणाऱ्या सहा जणांवर कुही पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपींकडून रोख रकमेसह दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
मंगळवारी (दि.20 जुलै) कुही पोलिसांना खात्रीशीर बातमीदाराकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुही शहरातील गजानन महाराज मंदिर परिसराच्या मागच्या बाजूस असलेल्या एका घरात काहीजण ताश पत्यांवर पैसे लाऊन जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. लागलीच पोलिसांनी दोघांना पाठवून बाहेरून सदर घराची पाहणी करण्यास पाठवले असता काहीजण जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले. लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड यांना याची माहिती देत कारवाईची परवानगी घेण्यात आली. परवानगी मिळताच कुही पोलिसांनी सदर घरात धाड टाकून पाहणी केली असता सहा जण बावन्न पानांच्या ताश पत्त्यांवर पैसे लावून हार जीतीचा खेळ खेळत असताना दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 52 ताश पत्ते, अंग झडतीत 13580 रुपये व डावावर 1960 रुपये असे 15540 रुपये , दोन मोटरसायकल एकूण 85 हजार रुपये किमतीच्या असा 100540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1987 कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोनि स्वप्नील गोपाले, गोकुल सलामे, गीतेश डझाने ,अनिल करडखेडे, राहुल देवीकर, सीमा भूते यांच्या पथकाने केली आहे.