दुचाकीला धडक देत जखमीला पुलाखाली फेकून कार चालकाचा पळ, उपचाराअभावी युवकाचा मृत्यू

दुचाकीला धडक देत जखमीला पुलाखाली फेकून कार चालकाचा पळ, उपचाराअभावी युवकाचा मृत्यू

नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॅशनल कँसर इंस्टिट्युटसमोर एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला तर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला. कारचालकाने कार थांबवली आणि जखमीला रुग्णालयात नेतो असे सांगून त्याला कारमध्ये घेतले आणि जखमीला रूग्णालयात न नेता पोलिसांच्या भीतीने कार चिंचभवन पुलाखाली थांबवली. कारमधील जखमी युवकाला पुलाखाली फेकले आणि निघून गेला. कृष्णा बुलसे (रा. अयोध्या नगर, हुडकेश्वर) असे मृत युवकाचे नाव आहे.

बांधकामावर मिस्त्री असलेले रुपेश वाळके आणि कृष्णा बुलके हे दोघेही गुमगाव येथे बांधकामाच्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते. सायंकाळी आठ वाजता ते दुचाकीने घराकडे परत जात होते. नॅशनल कँसर इंस्टिट्युटसमोरुन जात असताना मागून भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर दोघेही खाली फेकले गेले. मात्र, दुचाकीच्या मागे बसलेला कृष्णा यांच्या डोक्याला जबर मार लागला. कारचालक पळून न जाता थांबला. त्याने जखमी कृष्णा याला ताबडतोब रुग्णालयात पोहचविण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, कारचालकाला पोलिसांच्या अटकेची आणि गुन्हा दाखल होण्याची भीती वाटायला लागली. त्यामुळे त्याने जखमी कृष्णा याला दवाखान्यात नेण्याऐवजी चिंचभवन पुलाखाली कार थांबवली आणि अंधारात जखमी कृष्णा याला पुलाच्या खाली फेकून पळ काढला. पहाटेपर्यंत उपचार न मिळाल्यामुळे कृष्णाचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला.

रुपेश वाळके यांनी कृष्णाच्या पत्नीला माहिती दिली आणि पोलिसांनाही कळवले. बेलतरोडी, हुडकेश्वर आणि हिंगणा पोलीस घटनास्थळावर पोहचले. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. जखमी कृष्णाला कोणत्या रुग्णालयात दाखल केले, याचा शोध घेण्यात आला. मात्र, मेडिकल, मेयोसह जवळपासच्या एकाही हॉस्पिटलमध्ये कृष्णावर उपचार सुरु नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहिम राबवली. पहाटे साडेतीन वाजता चिंचभवन पुलाखाली कृष्णाचा मृतदेह सापडला. मात्र, कारचालक फरार झाला. हिंगणा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन फरार कारचालकाचा शोध घेणे सुरु केले आहे.